30.1 C
Ratnagiri
Wednesday, May 15, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeMaharashtraमाजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी कालवश

माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी कालवश

दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (वय ८६) यांचे आज पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. जोशी यांना गुरुवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी अनघा, पुत्र उन्मेष, विवाहित कन्या नम्रता, अस्मिता, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दुपारी दादर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

माटुंगा येथील रुपारेल कॉलेज जवळील त्यांच्या निवासस्थानापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ शिवसेना नेते लिलाधर डाके, ठाकरे गटाचे खा. संजय राऊत, माजी खा. अनिल देसाई उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आमदारही यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये मंत्री दीपक केसरकर, शंभुराज देसाई, खा. राहुल शेवाळे यांचा समावेश होता. तत्पूर्वी जोशी यांचे पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक सु.ना.जोशी, विश्वनाथ नेरूरकर, महादेव देवळे, विशाखा राऊत, दत्ता दळवी, श्रद्धा जाधव, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या मातुःश्री मधुवंती ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले. शेवटपर्यंत ठाकरेंसोबत गेल्या वर्षभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशी सार्वजनिक आणि राजकीय घडामोडींपासून दूर होते. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतरही मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. मात्र आज त्यांच्या अंत्यविधीला शिवसेनेत पडलेले दोन गट ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी त्यांची भेट घेतली होती, मात्र त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट करत ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केल्यानंतर पहिल्या फळीतील शिवसैनिक असणारे मनोहर जोशी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बनले.

संसदीय राजकारणात शिवसेनेच्या वाट्याला आलेली सर्व पदे प्रथम भूषविण्याचा मान मनोहर जोशी यांनाच बाळासाहेबांनी दिला. जोशींवर बाळासाहेबांचा विश्वास होता. त्यामुळेच शिवसेनेचा पहिला महापौर, पहिला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा पहिला लोकसभा अध्यक्ष ही संसदीय आणि वैधानिक पदे मनोहर जोशींकडेच आली. मनोहर जोशींना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास बाळासाहेबांनी सांगितले त्यावेळी कसलीही खळखळ न करता जोशी यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही ते बाळासाहेबांच्या खास मर्जीतील नेते राहिले. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील हजारो तरुणांना कौशल्यविकासाचे धडे दिले.

RELATED ARTICLES

Most Popular