टायगर इज कमिंग’ अशी जाहिरात करणाऱ्यांचा टायगरच मैदान सोडून आधीच पळाला, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी पळ काढला आहे, असा जोरदार टोला उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे ठाकरे गटाचे प्रमुख सचिन कदम यांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत हा टोला त्यांनी लगावला. अंत्यत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.
या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्रकार परिषद घेऊन निलेश राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध केला. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले, टायगर इज कमिंगची केलेली बॅनरबाजी ही राड्याचे द्योतक होते. आमदार जाधवांना उत्तर देण्यासाठी अथवा राडा करण्यासाठी सभा घेतली, हे यातून स्पष्ट झाले आहे. सुरवातीपासून राणे हे उद्धव ठाकरे व पक्षाच्या नेत्यांवर अर्वाच्च शिवराळ भाषेत बोलत होते. त्याचेच उत्तर जाधव यांनी कणकवली येथे दिले. राजकारणात या गोष्टी चालत असतात. परंतू कायदा हातात घेणे अत्यंत चुकीचे आहे. राणेंच्या कृतीतून लोकशाही धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
अशा गोष्टीला भाजप खतपाणी घालणार असेल तर ते दुर्दैव आहे, असे सचिन कदम म्हणाले. आगामी कालावधीत निवडणुका होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था, धाब्यावर बसवून वाटेल तसे भाजपनेते वक्तव्य करीत सुटले आहेत. राणेंकडून जिल्ह्यात शांतता भंग करण्याचे काम सुरू असून ते भाजपकडून जाणीवपुर्वक घडवले जात आहे. त्यास पोलिसांनी वेळीच आळा घालावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काळात मोठ्या घटना घडतील, पोलिसांनी वेळीच खबरदारी बाळगून राणेंवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख चाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संतोष पवार उपस्थित होते.