रखडलेल्या रत्नागिरीच्या हायटेक बसस्थानकाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. जुना ठेका रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्चित केला आहे. रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका मिळाला आहे. त्यामुळे काही दिवसांतच बसस्थानकाचे काम जोमाने सुरू होणार आहे. विशेष म्हणजे काम पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे समजते. नुकतीच या संदर्भात महत्त्वाची बैठक भय्या सामंत यांनी घेतली. १० कोटींवरून आता हे काम १८ कोटींवर गेले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला निधी दिला जाणार आहे.
राज्यासह जिल्ह्यातील बहुतेक बसस्थानकांची कामे एमआयडीसीकडून केली जाणार आहेत. जुना ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचा ठेकाच रद्द करण्यात आला आहे. त्याची देणी पूर्ण करून लवकरच फेर निविदा करण्यात आली. सहा वर्षांमध्ये बांधकामाची किंमत वाढल्याने १० कोटी ऐवजी १४ कोटींचा हा प्रस्ताव महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला होता. हे काम रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्मान सेनेसह अनेकांनी बंद असलेल्या कामावरून आंदोलन केले.
लवकरात लवकर काम सुरू न केल्या येथे गुरं आणून बांधू, असा इशाराही मनसेने दिला होता. ठेका रद्द केल्यानंतर याची फेर निविदा काढून रत्नागिरीतील निर्माण ग्रुपला हा ठेका देण्यात आला आहे. वाढीव दरानुसार सुमारे १८ कोटींचे हे काम आहे. निर्माण ग्रुपला ताकद आणि कौशल्य पणाला लावून पावसाळ्यापूर्वी बसस्थानकाची इमारत उभारण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना भय्या सामंत यांनी दिल्याचे समजते.