28.2 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

होळीसाठी कोकण रेल्वे सज्ज मुंबई – सावंतवाडी स्पेशल गाडया

होळीच्या सणासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून...
HomeKhedरस्ते सुधारले तर कोकणात वर्षभर पर्यटन, पर्यायी रस्त्यांकडे दुर्लक्ष

रस्ते सुधारले तर कोकणात वर्षभर पर्यटन, पर्यायी रस्त्यांकडे दुर्लक्ष

पुणे-मुंबईसह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांनी गर्दी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनवाढीला रस्त्यांच्या दुरवस्थेचा खो बसत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्याला जोडणारे रस्ते अधिकाधिक चांगले झाले तर कोकणात बारमाही पर्यटन सुरू राहील. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला होईल. हंगाम वगळताही पर्यटक कोकणात येणे पसंत करतील. नाताळच्या सुटीनिमित्त विविध पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकांकडून रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नाताळ सुटी, नववर्ष स्वागतासाठी पुणे-मुंबईसह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर प्रचंड गर्दी आहे; मात्र, जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व ऐतिहासिक स्थळांकडे जाण्यासाठीच्या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. शाळा व महाविद्यालयांच्या सहलींसह विद्यार्थ्यांचा ओघही यंदा वाढलेला आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे.

तरीही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही भागांतील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी पर्यटकांची डोकेदुखी ठरलेली आहे. त्यामुळे प्रवासाचे वेळापत्रक बिघडत असून, पर्यटन कंटाळवाणे झाले आहे. रस्त्याचे आंबा घाटातील चौपदरीकरण सुरू आहे. कुंभार्ली घाटातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी ताम्हिणी घाट मार्गे रत्नागिरी जिल्ह्यात येण्याचा पर्याय निवडला. परिणामी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून, तिकडेही वाहतूककोंडी होत आहे. त्यामधून मार्गक्रमण करताना – पर्यटक बेजार झाले आहेत.

दापोलीला जाण्यासाठी आलेले युवराज देसाई यांनी कुंभार्ली घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, खड्ड्यांतून प्रवास करताना आम्हाला नियोजित ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. आमच्यासोबत घाटातून प्रवास करणारे अन्य वाहनचालकसुद्धा अक्षरशः जीव मुठीत धरून घाट उतरत आहेत. कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या दुरवस्थेच्या त्रासापासून वाचण्यासाठी पुणे येथील सचिन वाणी हे उद्योजक आपल्या कुटुंबासह ताम्हिणी घाट मार्गे चिपळूणमध्ये परशुराम देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी वाहनांची संख्या वाढल्याने त्यांना चिपळूणमध्ये येण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

कुंभार्ली घाटाकडे पर्यटकांची पाठ – पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून चिपळुणात येणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. येथील दहा ते पंधरा फुटापर्यंतचा रस्ता वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी वाहनांना अपघात होण्याचा धोका आहे. खराब रस्ते व खड्यांमुळे अनेक पर्यटक चिपळूणकडे पाठ फिरवत असून, काही पर्यटक सिंधुदुर्ग व रायगड आणि रत्नागिरीसारख्या पर्यटन जिल्ह्यांकडे वळत आहेत. परिणामी, चिपळूणसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर गंभीर संकट ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular