रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड खाडीत हाऊसबोट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची हाऊसबोट आणली गेली असून, तिची चाचणी घेण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी सैतवडे ते राई अशी सैर केली. तेथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेतानाच काही सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. येत्या आठ-पंधरा दिवसांत उर्वरित चाचण्या झाल्या की, ती बोट पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. याच धर्तीवर अजून चार बोटी पुढील महिनाभरात येणार आहेत. उमेद प्रकल्पांतर्गत महिला बचतगटाच्या माध्यमातून हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार आहे. येथील कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहायला मिळणार असून, याद्वारे रोजगारही मिळणार आहे.
सिंधुरत्न योजनेतून आकारला जाणारा आणि महिलांच्या सामर्थ्याला नवी उभारी देणारा हा हाऊसबोट प्रकल्प येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात उतरणार आहे. चार दिवसांपूर्वी ही बोट जयगड येथील खाडीत दाखल झाली. मुंबईमधून पाच बोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी तयार केल्या आहेत. जलपर्यटनावर आधारित व्यवसाय उभे राहावेत, अशी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी मांडली होती. त्यासाठी उमेदच्या महिलांना प्रशिक्षणही दिले गेले. त्यासाठी सिंधुरत्न समृद्धी योजनेतून पाच कोटींचा निधी प्राप्त झाला. जिल्ह्यातील पाच प्रभागसंघांना प्रत्येकी एक कोटीप्रमाणे त्याचे वितरण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील सैतवडे व राई या परिसरातील पहिला प्रकल्प येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. ही बोट कोतवडे प्रभाग संघाला चालवण्यासाठी दिली आहे. त्याची पहिली चाचणी नुकतीच पूर्ण झाली.
या परिसरातील कांदळवन, पक्षी, मासे, विविध झाडे पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. सीईओ पुजार यांनी काल (ता. ५) सायंकाळी सैतवडे ते राई अशी बोटीमधून फेरी मारली. यावेळी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयाज पीरजादे, जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर, अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते. सध्या बोटीवरील छत उभारण्याचे काम सुरू आहे. पुढील आठ दिवसांत उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ती बोट कार्यान्वित केली जाईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.