कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाच्या वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने भक्कम पावले उचलली आहेत. जिल्ह्यात प्रथमच याअनुषंगाने आपत्काली परिस्थितीला तोंड देणारी राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबरला टेबलटॉप एक्झरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबरला प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५ गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्ह्यातील आंबोळगड (ता.राजापूर), गणपतीपुळे (ता. रत्नागिरी), वेलदूर (गुहागर), कर्दे (दापोली) आणि वाल्मिकीनगर (मंडणगड) या गावांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील या ५ गावांमध्ये ९ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालमीच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालमीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरी वस्तीचे स्थलांतरण, करावयाची कार्यवाही, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींबाबत आजच्या बैठकीत मार्गदर्शन केले. चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालमीच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दूरदृश प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवारा शेड रखडलेलेच कोकण किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांमध्ये फियान, तौक्ते, निसर्ग, महाचक्रीवादळ अशा अनेक चक्रीवादळांचा किनारपट्टीला मोठा फटका बसला. यामध्ये वित्त व जीवित हानी झाली. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असल्याने राज्य शासनाने याबाबतची पावले उचलली आहेत. यापूर्वी चक्रीवादळ सौम्यीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे कामदेखील सुरू आहे. परंतु, मंजूर तीन निवारा शेडचे काम मात्र कासवाच्या गतीने सुरू आहे. चक्रीवादळामध्ये किनारपट्टीभागातील नागरिकांना या शेडचा आसरा असणार आहे. परंतु, हे काम रखडले आहे.