म ाजी केंद्रीय मंत्री शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार चिपळूणच्या दौऱ्यावर येत असून रविवार आणि सोमवार असे दोन दिवस ते येथे तळ ठोकणार आहेत. यावेळी काही प्रकल्पांना ते भेटी देणार असून काही महत्वाच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत. तसेच सोमवारी सकाळी चिपळूण बहादूरशेख नाका येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला संगमेश्वर-चिपळूणसह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर चिटणीस तथा पक्ष निरीक्षक बबनराव कणावजे चिपळूणमध्ये दाखल झाले असून त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन खा. शरद पवार यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, कुमार शेट्ये, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बबनराव कणावजे यावेळी म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू झालेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झालेले आहेत. मात्र चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातुन एकमेव प्रशांत यादव यांचा अर्ज पक्षाकडे आलेला आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार असल्याने आमची हक्काची जागा म्हणून आम्ही सर्वाधिक लक्ष चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाकडे दिलेले आहे. आमच्या पक्षाकडून प्रशांत यादव यांचे नाव निश्चित असले तरी शेवटी महाविकास आघाडीचा निर्णय अंतिम असेल, आघाडीकडून निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाईल असेही ते म्हणाले.
पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी काही महत्वाच्या मतदारसंघाकडे अधिक लक्ष घातले असून त्याअनुषंगाने शरद पवार साहेब रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी चिपळूणमध्ये येणार आहेत. यादिवशी त्यांचा चिपळूणमध्ये मुक्काम राहणार आहे. तसेच वाशिष्ठी दूध प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आंशा ठिकाणी ते भेटी देणार आहेत. तसेच माजी आमदार रमेश कदम यांच्या निवस्थानी देखील शरद पवार भेट देणार असून काही प्रमुख पदाधिकारी, जुने मित्र, जेष्ठ पदाधिकारी व नेत्यांच्या भेटीगाठी देखील ते घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. अशी माहितीही बबन कणावजे यांनी यावेळी दिली:
सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता चिपळूण शहरातील बहादूरशेख नाक्यावरील सावरकर मैदानात खा. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच सर्वसाम ान्य नागरिक देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ‘जयंत पाटील व पक्षाचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी स्पष्ट माहितीही कनावजे यांनी यावेळी दिली.