देवरुख येथील सप्तलिंगी नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेला भाऊ बुडत असल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने उडी घेतली मात्र तोही बुडाला. रविवारी सायंकाळी उशिरा एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. गणेश झेपले असे मृत तरुणाचे नाव असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, सचिन रामचंद्र झेपले (३२) हा रविवारी दुपारी आपल्या पत्नीसमवेत सप्तलिंगी नदी पात्रात गेले होते. येथील एका खडकावर त्याची पत्नी कपडे धुत होती. त्याचवेळी सचिन याला आंघोळीची व पोहण्याची ईच्छा झाली. त्यामुळे तो नदी पत्रात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन खोल डोहात बुडू लागला. पती बुडत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास येताच तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच धावत जाऊन आपला दिर गणेश याला कल्पना दिली.
भाऊ मदतीला धावला – गणेशने देखील भावासाठी धाव घेतली आणि ज्या ठिकाणी सचिन बुडाला होता त्याच ठिकाणी उडी घेऊन भावाला शोधण्याचा व वाचवण्याचा प्रयत्न तो करू लागला. परंतु भावाला वाचवताना तो ही बुडाला. परिसरात हे वृत्त समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर झाले आणि शोध मोहीम सुरु झाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी हजर झाले.
तसेच संगमेश्वरचे तहसीलदार अमृता साबळे, मंडळ अधिकारी व तलाठी देखील घटनास्थळी हजर झाले होते. रविवारी सायंकाळी उशिरा गणेश याचा मृतदेह हाती लागला, तर सचिनचा शोध रात्री पर्यंत सुरू होता. मयत गणेश हा अविवाहित होता. तर सचिनचे लग्न झालेले असून त्याला दोन मुली आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना झेपले कुटुंबावर झालेल्या या आघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण परिसरात सन्नाटा पसरला आहे.