27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunकाका-पुतण्या येणार चिपळुणात प्रशासनाची उडालेय गडबडघाई!

काका-पुतण्या येणार चिपळुणात प्रशासनाची उडालेय गडबडघाई!

चिपळूणमध्ये येत असून त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. रविवार व सोमवार असा दोन दिवस त्यांचा येथे मुक्काम राहणार असून सोमवारी ते शहरात जाहीर सभा देखील घेणार आहेत. तसेच काही ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यामुळे साहजिकच चिपळूणच्या अनेक रस्त्यावरून त्यांचा ताफा फिरणार आहे. पण त्यापूर्वी त्यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार शनिवारी चिपळूणमध्ये येत असून त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी ते देखील भेटी देणार आहेत. शनिवारी रात्री त्यांचा मुक्काम राहणार आहे. आता थोरले साहेब आणि धाकटे साहेब दोन्हीही येत असल्याने दोन्ही बाजूने गडबड सुरू आहे.

वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तयारी केली जात असून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. सहाजिकच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. पण त्याहीपेक्षा प्रशासन मात्र भलतेच अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवात रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला अजिबात सवड नव्हती. परंतु आता धावाधाव करून खड्डे बुजवले जात आहेत. जणू रस्त्याला पडलेली भोकं झाकण्यासाठी रात्रीचा देखील आटापिटा केला जात आहे. प्रत्यक्षात शहरातील सर्वच रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे आभाळच फाटलंय, मग ठिगळ तरी कुठे लावणार अशी अवस्था आहे. परंतु प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच नियोजन केले असते तर ही वेळ आलीच नम्रती, आशा प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत.

रस्त्यातील खड्डे भरण्याबरोबरव गटारांची साफसफाई, रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत साफसूफ करतानाच स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन देखील करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत त्यासाठी ही तयारी आहे की अजितदादांचा प्रशासनावरील धाक यामुळे हे घडते आहे? की थोरल्या साहेबांचा देशातील राजकीय दरारा पाहता प्रशासनाने ही खबरदारी घेतली असावी का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. परंतु काहीही असले तरी प्रशासन इतके अलर्ट झाले त्याचे मात्र कौतुक केले जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी असेच नेहमी चिपळूणमध्ये येत रहावे, म्हणजे चिपळूणकरांची खड्ड्यातून मुक्तता होईल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular