देशाच्या पर्यटन नकाशावर असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या १०२ कोटींच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून कायापालट होणार आहे; परंतु या आराखड्याअंतर्गत असलेल्या भुयारी गटर योजना निधीअभावी लटकली आहे. सुमारे ११ कोटींपैकी फक्त २ कोटी ४२ लाख एवढाच निधी खर्च पडला आहे. आतापर्यंत फक्त ३० टक्केच योजनेच काम झाले असून, निधी उपलब्ध होत नसल्याने ही योजना रखडली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. गणपतीपुळे विकास आराखड्याला पाच वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून ४० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यातून गणपतीपुळे परिसर सुशोभीकरण, रस्ते व पाणीपुरवठा अशा कामावर खर्चही झालेला आहे. उर्वरित निधीची शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे. गणपतीपुळे येथे दरदिवशी शेकडो पर्यटक भेट देतात. पर्यटन हंगामात हा आकडा लाखांवर जातो. या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी व तेथे असणाऱ्या सोयीसुविधांचा विचार केला, तर त्यावर मर्यादा येतात.
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या परिसरात पाण्याचा प्रश्नही निर्माण होतो. या सर्व प्रश्नांचा सर्वंकष विचार करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बृहत् विकास आराखडा तयार करण्यात आला. सुमारे १०२ कोटींचा हा विकास आराखडा आहे. त्या अंतर्गत गणपतीपुळे येथे भुयारी गटार योजना हाती घेण्यात आली आणि काम सुरू झाले. १० कोटी ९३ लाखांच्या या योजनेतून ५ हजार ७०० मीटर अंतरात गटार बांधण्याचे काम केले जाणार आहे. त्याद्वारे ००.७५ एमएलडी पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. योजनेतून ३१५ ठिकठिकाणी चेंबर ठेवण्यात आले आहेत. २१५ सर्व्हिस चेंबरदेखील आहेत. शासनाकडून आतापर्यंत केवळ २ कोटी ४२ लाखांचा प्राप्त झालेला निधीही खर्ची पडला आहे. ग्लोबल कन्स्ट्रक्शन ही कंपनी या योजनेतील गटार बांधण्याचे काम करत आहे; पण शासनाकडून उर्वरित निधी आलेला नाही. त्यामुळे या योजनेचे काम अर्धवट खितपत पडल्याच्या स्थितीत आहे.

