दापोली शहरासह तालुक्यात काल (ता.१५) रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिक सुखावले. मात्र यावेळी महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने त्यांची गैरसोय झाली. दरम्यान, बुधवारी (ता. १७) तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी रात्री (ता. ८) वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. अनेकांना भिजतच घरी जावे लागले. अर्धा तास पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
कोकण कृषी विद्यापिठाच्या हवामान शास्त्र विभागात ०.८० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. काल दिवसभरात मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीचे कमाल तापमान ३७ अंशावर गेले होते, तर किमान तापमान २३.३ अंश नोंदविले गेले आहे. गेले अनेक दिवस तापमानात वाढ झाल्याने त्याचा आंब्यावर परिणाम होत होता. मात्र काल पडलेल्या पावसाने झाडांना पाणी मिळाल्याने आंबा लवकर तयार होणार आहे. या पावसाचा तयार आंब्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, उष्णतेच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेची सूचना केलेली आहे.
दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरात पडदे आणि झडपांचा वापर करा, पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील दोन दिवस झळांचे – हवामान विभागाकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्ह्यात पुढील दोन दिवस तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २७ अंश दरम्यान राहणार आहे. तसेच १९ व २० एप्रिल या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तविला आहे, तर रायगड जिल्ह्यातही तापमान ३४ ते ३९ अंशादरम्यान राहणार आहे.