खेडचे माजी नगराध्यक्ष आणि धडाडीचे नेते वैभव खेडेकर हे मंगळवारी २३ सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या नरीमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यात वैभव खेडेकर यांच्यासह जिल्ह्यातील त्यांचे हजारो समर्थक देखील हातामध्ये ‘कमळ’ घेणार आहेत. दरम्यान वैभव खेडेकर यांच्यामुळे खेडला आणखी एक ‘लाल दिवा’ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. वैभव खेडेकर यांच्या या प्रवेश सोहळ्याकडे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वैभव खेडेकर यांच्यावतीने शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आज प्रवेश निश्चित – ४ सप्टेंबर रोजी हा प्रवेश होणार होता. मात्र मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भातील आंदोलनामुळे तो लांबणीवर पडला होता. दोनच दिवसापूर्वी वैभव खेडेकर यांनी मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेत पक्षप्रवेशाबाबत पुन्हा चर्चा केली आणि त्यानंतर २३ सप्टेंबरचा दिवस निश्चित झाला. खेडेकर यांच्या समर्थकांकडून पक्षप्रवेशाची जोरदार तयारी पुन्हा सुरू झाली आहे. वाहनांवर वैभव खेडेकर यांचा फोटो आणि कमळ चिन्ह लावून अनेक गाड्या मुंबईत जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अनेक वाहनांचा ताफ्यासह त्यांचे समर्थक – २२ सप्टेंबरला सायंकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पक्षप्रवेशादरम्यान जंगी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांच्यासमवेत नेमके कोणकोणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘कमळ’ हाती घेतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरेंची भेट न मिळाल्याची खंत – मनसेतून अचानक बडतर्फ करण्यात आल्याने आपणाला धक्का बसला, मागील अनेक वर्षांपासून आपले राज ठाकरें यांच्याशी आणि मनसे परिवाराशी आपुलकीचे, प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते राहतील, असे सांगत मनसेमधून आपणाला अचानक बडतर्फ करण्यात आल्याने मनस्वी दुःख झाले, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. बडतर्फ हा शब्द आपल्याबाबत कधी वापरला जाईल असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. हा निर्णय घेताना राज ठाकरेंकडे एकदा तरी बाजू मांडण्याची संधी मिळाली असती, तर दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ आलीच नसती. प्रयत्न केले पण यश आलं नाही, असं सांगत राज ठाकरे यांची भेट न मिळाल्याची खंत वैभव खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लवकरच लाल दिवा मिळणार? – दरम्यान वैभव खेडेकर यांच्यासम वेत खेडमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील जवळपास ९९% मनसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे वैभव खेडेकर यांच्या रूपाने भाजपला एक धडाडीचा नेता मिळाल्याचेही बोलले जाते. कोकणात पक्षसंघटना बळकट करण्यासाठी भाजपकडून वैभव खेडेकरांना महामंडळाच्या रूपात लाल दिवा मिळणार असल्याची चर्चा संपूर्ण खेडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.