पाऊस लांबला आहे. कोयनेची वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही तर चिपळूण शहरात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ७५ हजार लोकसंख्या असलेल्या शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. चिपळूणसह लोटे परिसरातील एमआयडीसीलाही पाण्याची टंचाई भासणार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर वाशिष्ठी नदीला कोयनेचे अवजल सोडले जाते. यातील १४ लाख लिटर पाणी पालिका शहरातील नागरिकांसाठी उचलते. आठ एमएलडी पाणी खेर्डी एमआयडीसीसाठी तर २४ एमएलडी पाणी लोटे परशुराम एमआयडीसीसाठी उचलले जाते.
वाशिष्ठी नदीकिनारी असलेल्या ७२ गावांची पाणीयोजना कोयनेच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पावसाची सुरुवात अतिशय मंद गतीने सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. धरणात केवळ दहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. मागणीच्या काळात हक्काने वीजनिर्मिती उपलब्ध करून देणारा कोयनेचा चौथा टप्पा आठ दिवसांपूर्वी पाण्याअभावी बंद करण्यात आला. टप्पा एक-दोन-तीनमधूनही काटकसरीने वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती सुरू असताना वाशिष्ठी नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत होते; मात्र आता वीजनिर्मितीवर मर्यादा आल्याने नदी कोरडी पडली आहे.