पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात महागाईचा उच्चांक गाठला आहे. कोणतीही वस्तू दुपटीपेक्षा अधिक महाग झाली आहे. जनतेचे उत्पन्न तेवढेच आहे. अदानी घरजावई असल्या सारखा त्यांना सुविधा दिल्या जात आहे. तर महाराष्ट्रात राज्याची अर्थव्यवस्था एक मिलियन डॉलर्स करण्यासाठी कोकणचा बळी दिला जातोय. कोकणातील १६२५ गावे सिडकोच्या ताब्यात देऊन येथील जागा धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी केला. गुरूवारी रत्नागिरी शहरातील राजिवडा मोहल्ला येथे महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संपूर्ण मोहल्ला भगवांमय झाला होता. तर मेळाव्याला महिलांची उपस्थिती मोठी होती. यावेळी मार्गदर्शन करताना खा. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांसह महायुती उमेदवार नारायणराव राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या मेळाव्याला लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद्र शेरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरसी आणण्याच्या तयारीत आहेत.
पुन्हा सत्तेवर आले तर पहिले काम तेच होणार आहे. एनआरसी आल्यानंतर प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. प्रत्येकाला आपला जन्मदाखला द्यावा लागेल. ७० ते ७५ वर्षांच्या आता जन्मदाखला कोण देणार? अशांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे त्यांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे. हे टाळायचे असेल तर मोदींना सत्तेत जाण्यापासून रोखले पाहिजे व ही जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. देशाची वाटचाल हुकमशाहीच्या दिशेने सुरू आहे. भाजपचे जो ऐकत नाही त्याला तुरूंगात पाठविले जाते.
३०० युनिट वीज जनतेला मोफत देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जनतेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या पोटात दुखू लागले. त्यामुळेच भ्रष्टाचाराचे कारण दाखवून त्यांना ऐन निवडणुकीत तुरूंगात डांबण्यात आल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडलेत. सोन्याचे दर लाखाच्या घरात निघाले आहेत. कोकणात प्रचंड गरीबी आहे असे ‘असताना भाजपच्या नेत्याकडे कोट्यवधी रुपयांचे सोने आले कुठून? असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी मेळाव्यात राजेंद्र महाडीक, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, हारीस शेकासन, रमेश शहा यांनी आपली मनोगते व्यक्त करत खा. राऊत यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.