26.8 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeChiplunसाडेचार हजार मतदान यंत्र सज्ज तपासणी पूर्ण

साडेचार हजार मतदान यंत्र सज्ज तपासणी पूर्ण

जिल्ह्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी ९२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरू असून, याचाच एक भाग म्हणून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन मिळून चार हजार ५२६ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तपासणी करून सज्ज ठेवली आहेत. मतदारसंघनिहाय वर्गीकरण प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांच्या स्ट्रॉगरूममध्ये ठेवली जाणार आहेत. २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना मतदान करण्याकरिता ओळखपत्र दाखविण्याबाबत कोणकोणती कागदपत्रे दाखवू शकतात, याबाबतही निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली. निवडणूक विभागाकडून सर्व प्रकारची पूर्व तयारी सुरू असून, जिल्ह्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी ९२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.

त्यासाठी लागणारे साडेचार हजार निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मतदानासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तपासणी करून ती सीलबंद करून सज्ज आहेत. यामध्ये बॅलेट युनिट २०९३, कंट्रोल युनिट ११७१ आणि व्हीव्हीपॅट मशीन १२६२ अशी एकूण ४ हजार ५२६ मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदारसंघनिहाय वर्गीकरण करून त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहेत. मतदान यंत्रे सज्ज ठेवताना बॅलेट व कंट्रोल युनिट १२० टक्के आणि व्हीव्हीपॅट मशीन १३० टक्के सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघनिहाय ४६ मतदान यंत्रे अतिरिक्त ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र सादर करतील.

 जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करून शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुरावा म्हणून आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र याप्रमाणे मतदानावेळी विविध प्रकारची निश्चिती करून देण्यात आलेली ओळखपत्रे दाखविल्यास मतदान करता येणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular