तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याशेजारी तसेच शहरातही प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे, बाटल्यांचे खच पाहायला मिळत आहेत. हे प्लास्टिक मोकाट गुरे खातात तसेच काहीवेळा नदीकिनारी असल्यास पाण्यातून वाहून जात आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्याचा अतिवापर होणे हे आपल्या निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी एक मोठा धोका बनला आहे. यामुळेच प्लास्टिकचा भस्मासूर सर्वांनाच घातक ठरणार आहे. लोक हाच भस्मासूर उघड्यावर, रस्त्याच्या कडेला टाकून आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत. रत्नागिरी शहर, परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहायला मिळतो. जागोजागी प्लास्टिक संकलनासाठी स्वतंत्र कुंड्या ठेवल्या तरीही अनेक लोक गाड्यांवरून येताना रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकत आहेत. या अस्वच्छतेमुळे पर्यटनावरही परिणाम होतो.
यात सुधारणा कधी होणार? असा यक्षप्रश्न पडला आहे. पावस-गोळप मार्गावर गोळप उतारात, वायंगणी फाटा, साखरतर पुलाजवळ, सोमेश्वर नदीकिनारी प्रचंड प्लास्टिक टाकलेले पाहायला मिळत आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यातून घातक रसायने पर्यावरणात मिसळत असून, यामुळे लोकांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. यामुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड आणि इतर विविध विकार निर्माण होऊ शकतात. प्लास्टिक जरी वापरण्यास सोपे असले तरी त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम खूप गंभीर आहेत. प्लास्टिकचा कचरा जास्तीत जास्त तयार होतो आणि त्याचे निवारण करणे किंवा पुन्हा वापर करणे खूप कठीण आहे. त्याच्या फेकण्यामुळे किंवा नष्ट होण्यामुळे पृथ्वीवर आणि समुद्रात दीर्घकालीन प्रदूषण होत आहे.
हवी ही उपाययोजना – प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे तसेच इतर पर्यावरणदृष्ट्या अधिक टिकाऊ वस्तू जसे की, कागद, काच, स्टील वापरता येईल. ज्या प्लास्टिक वस्तूंचा वापर केला आहे त्याचे योग्यप्रकारे पुनर्वापर करता येईल. लोकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगण्यासाठी जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.