चिपळूण तालुक्यातील डेरवण राजेवाडी धरण गळतीमुळे कापशी नदी पात्र डिसेंबर महिन्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने सावर्डेसह अन्य गावांसमोर पाणीटंचाईचे संकट आवासून उभे राहिले आहे. कापशी नदीलगत कार्यरत नळ पाणी योजनेच्या विहिरीचा नैसर्गिक पाण्याचा स्रोत आटल्याने तेथील योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सावर्डे येथे कार्यरत राष्ट्रीय पेयजल योजनेची विहिरीचा नैसर्गिक स्त्रोत थांबला असून गेल्या महिन्यापासून जलस्वराज्यची नळपाणी योजना बंद झाली आहे. येथील ग्रामस्थांना बोअरिंग, पुरातन विहिरीवरून पाणी आणावे लागत असून महिलाच्या डोक्यावर पुन्हा हंडा आला आहे.
या विहिरीची पाणी पातळी फार काळ टिकणारी नसल्याने येणाऱ्या काळात जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. सावर्डे येथील कासार वाडी, वावे, गुडेकर या वाड्या असणारी ग्रामपंचायत नळपाणी योजना अद्याप सुरू असली तरी येथील विहीरीतील नैसर्गिक जल स्तोत्रची क्षमता कमी झाल्याने येथील पाणी पुरवठा सुरू नसून तोही फारकाळ टिकणार नाही. आमदार शेखर निकम यांनी सावडेंसाठी दूरदृष्टीने गावासाठी १७ कोटींची जलजीवन योजना मंजूर केली असून या योजनेंतर्गत जलसंधारण विभागाच्या आंबतखोल धरणालगत या योजनेची जॅकवेल (विहिर) उभारण्यात आली असून जॅकवेल ते साठवण टाकी अशी जलवहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सावर्डेवासीयांसाठी जलजीवन आशेचा किरण दिसत आहे.
सावर्डेजवळून वाहणाऱ्या कापशी नदीचे पात्र पूर्णपणे कोरड पडलं असून कापशी नदीलगत असणाऱ्या गावांच्या सर्व पाणी योजना बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. राजेवाडी धरणाच्या गळतीनंतर जलसंधारण विभागाने सोडलेले पाणी या पाणी टंचाईस कारणीभूत ठरले आहे. डेरवण रुग्णालय, मेडिकल महाविद्यालयत, नर्सिंग कॉलेज, सह्याद्री शिक्षण संस्था यामुळे सावर्डे गावाने शहरीकरणाकडे झेप घेतली. मुंबई, पुणे, शहरातील व स्थानिक बिल्डर्सनी सावड्र्यात पाय रोवले. यामुळे सावर्यात अनेक मोठ्या इमारती, खासगी बंगले उभे राहिले असून या इमारतींना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कापशी नदी पात्रालगत असून नदीपात्र कोरडे पडल्याने खासगी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांसमोर पाणी संकट उभे टाकले आहे.