गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार भास्कर जाधव निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महायुतीकडून माजी आमदार विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून नातू उमेदवार असतील की, चव्हाण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. २००९ सारखी परिस्थिती येथे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
शिवसेनेचे निरीक्षक रवींद्र फाटक यांनी चिपळूणचा दौरा केला. यावेळी सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देण्या संदर्भात कार्यकर्त्यांनी मागणी केली. आपल्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन रवींद्र फाटक यांनी दिल्याचीही माहिती आहे. गुहागर हा भाजपचा परंपरागत हा मतदार संघ आहे. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. विनय नातू यांची तयारीही सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी गुहागरमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये पक्षाचे राज्य सरचिटणीस नीलेश राणे यांनी डॉ. विनय नातू यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे जाहीर केले होते; मात्र ही जागा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवी आहे.
शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये गुहागरची जागा भाजपच्या वाट्याला येत होती; मात्र २००९च्या निवडणुकीत ती शिवसेनेने घेतली. त्यावेळी नातू यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले. नंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढूनसुद्धा त्यांना भास्कर जाधव यांचा पराभव करता आला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना गुहागर मतदारसंघातून २७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कम असल्याचे सांगितले जात आहे.