कोकण किनारपट्टीवर मध्यरात्रीपासून मतलई वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र दापोलीत दिवस व रात्रीच्या हवामानात मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. दिवस व रात्रीच्या तापमानात सुमारे १७ अंश सेल्सिअसचा फरक आहे. त्याचा आंबा-काजूवर परिणाम होऊ शकतो. दापोलीत सोमवारी (ता. ११) मागील चोवीस तासात कमाल तापमान ३४.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतके होते. तसेच सापेक्ष आर्द्रता सकाळी ९४ टक्के आणि दुपारी ५९ टक्के होती. वाऱ्याचा वेग ताशी १.७ इतका नोंदला गेला आहे. गतवर्षी याच दरम्यान कमाल तापमान ३३.३ तर किमान तापमान २१.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले होते. या परिस्थितीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच आंबा-काजू पिकांनाही फटका बसू शकतो. कोकण किनारपट्टीवर मध्यरात्रीपासून मतलई वारे सुरु झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. या थंड वाऱ्यांमुळे हिवाळ्याचे आगमन झाल्याचे संकेत आहेत.
मतलई वारे जे जमिनीकडून समुद्राकडे जातात आणि खारे वारे किंवा समुद्री वारे जे समुद्राकडून जमिनीकडे येतात. या दोन्ही वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने रुंद नद्या, खाडी भाग, निमुळते डोंगर, नदीमुख खाड्या, छोट्या छोट्या नद्यांचा प्रदेश, धरण, तलाव अशा ठिकाणी हे वारे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे समुद्री भागात पाण्याचे तापमान वाढलेले असते. त्यामुळे हवेचा दाब जमिनीवरील हवेच्या दाबापेक्षा बराच जास्त असतो. वारा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. त्यामुळे साधारणपणे दुपारी २ वाजल्यानंतर वारे समुद्राकडील जास्त दाबाकडे जमिनीकडील कमी दाबाकडे वाहताना दिसतात.