मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कामांना गती मिळाली असताना, गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे ब्रेक लागला आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आणि गॅबियन वॉल उभारणीच्या कामात खोडा पडल्याने यंत्रसामग्री जागेवरच आहे. आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे.
लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पावसापूर्वी ते काम पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत; तर दुसरीकडे गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे कामही मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा येथे कार्यरत असताना गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडाल्याने परशुराम घाटातील कामावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. घाट धोकादायक स्थितीत असल्याने साहजिकच तेथील कामे ठप्प झाली आहेत.
नियोजनालाही दणका – कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. त्या दृष्टीने महामार्ग आणि कंत्राटदार कंपनीने आपल्या कामांचे नियोजन केलेले असते. मात्र, पंधरा दिवस अगोदरच पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नियोजन विस्कटले आहे.