मिऱ्या बंधाऱ्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा आला तरीही सुरू न झाल्यामुळे मिऱ्या ग्रामस्थ पत्तन विभागावर धडकले. गावचे संरक्षण करण्यासाठी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली. ठेकेदार आणि सल्लागार कंपनीशी बोलून यावर लवकरच तोडगा काढु, असे आश्वासन पत्तन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे हे काम करणे शक्य नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांना हा पावसाळा धोकादायक परिस्थितीला तोंड देत काढावा लागणार आहे. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या अडीचशे मीटरच्या टप्प्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचे हे काम शिल्लक आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडे तीन किमीचे काम करण्यात येणार आहे. मरीनड्राईव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. साडेतीन किमीपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सव्र्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी हा एक डेंजर झोन आहे. समुद्राचा प्रवाह बदलला असल्यामुळे या भागात उधाणाच्या लाटांचा मोठा मारा बसतो. त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धुप होऊन हे पाणी मानवी वस्तीत येण्याची भिती आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद होता.
जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. परंतु आता संमती दिली असली तरी समुद्राला उधाण असल्याने बंधाऱ्याचे तळातून खोदकाम करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे काम होण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भितीच्या छायेखाली असलेल्या मिऱ्यावासीयांना आज पत्तन विभागाचे अधिकारी श्री. साळुंखे यांनी आश्वासन दिले की, ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू. यावेळी मिऱ्या गावातील ग्रामस्थ सुनिल कांबळे, नागेश कांबळे, राजू भाटकर, छोट्या भाटकर, बाबू कांबळे, मनोज पानगले, अनिल पानगले, विजय तळेकर, मुरलीधर पन्हळेकर, दत्तगूरु कीर आदी उपस्थित होते.