कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असल्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कशेडी बोगद्यामधील एक लेन सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. अपघाताने शापित असलेल्या कशेडी घाटामध्ये अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात भरीस भर म्हणून मुख्य वळणावर पडलेले खड्डे हे आता जीवघेणे ठरू लागले आहेत. या खड्डयांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. खड्डे चुकवताना होणाऱ्या अपघातामुळे ही आता गंभीर बाब बनू लागली आहे.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेवला असल्याने अद्याप कशेडी बोगदा यातील एक लेन सुरू होणार होती; मात्र ती सुरू न झाल्याने सध्याचा प्रवास कशेडी घाटातूनच सुरू आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे मार्गावर अपघात व वाहतूककोंडी देखील होत असल्याने हे खड्डे बुजवणार तर कधी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षणीय असते. मोठ्या प्रमाणात एसटी बसेस तसेच खासगी वाहने या घाटातून जात असतात; मात्र यावर्षी देखील गणेशभक्तांना कशेडी घाटातील मुख्य वळणावर असलेल्या खड्यांचे विघ्न पार करून प्रवास करावा लागणार आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा सप्टेंबरमध्ये सुरू होईल, असा आशावाद निर्माण केला होता. दरम्यान, घाटात वाढते अपघात होत असताना या ठिकाणी पोलिस वाहतूक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे वाहतुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत; मात्र खड्यांमुळे होत असलेले अपघात अन वाहतूककोंडी याच्यामुळे त्यांच्यासमोर देखील नवीन आव्हान उभे ठाकले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशातून व्यक्त होत आहे.