लांबलेला पाऊस आणि उन्हाचा वाढता कडाका यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. एकूण पाणीसाठ्याच्या सरासरी २३ टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे. त्याचा परिणाम भविष्यात पाणीटंचाईच्या तीव्रतेवर होणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला. अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा परिणाम झाला नाही. उन्हाचे चटके सहन करावेच लागत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज होता; मात्र बिपरजॉय चक्रीवादळानंतर कोकणात वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाऊसही लांबला. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात २१ पासून मुसळधार पाऊस पडू शकतो. तोपर्यंत उष्माघाताची लाटा राज्यात कायम राहणार आहे.
आतापर्यंत वीस दिवसांत जिल्ह्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दिसत आहे. मध्यम प्रकल्पात नातूवाडीमध्ये ६. ३४३ दलघनमीटर, गडनदीमध्ये ५५ दलघनमीटर, अर्जुना प्रकल्पात ५६ दलघनमीटर, मुचकुंदीमध्ये १४.६६ दलघनमीटर पाणी साठा आहे. नातूवाडीत प्रकल्पात एकुण साठ्याच्या २३ टक्केच पाणी उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की स्रोत कमी झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सध्या अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा असून आठवडाभर आगमन लांबले तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.