गणपतीपुळेजवळील मालगुंड समुद्रकिनारी २८ फुटी महाकाय मृत देवमासा (व्हेल) मासा आढळून आला. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. साधारण महिनाभरापूर्वी हा मासा मृत झाल्यामुळे पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. मालगुंड समुद्रकिनारी जेसीबीने मोठा खड्डा काढून पुरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती रत्नागिरी कांदळवन वनक्षेत्रपाल किरण ठाकूर यांनी दिली. कोकण किनारपट्टीवर देवमाशांचा राबता वाढत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याचा प्रत्ययही वारंवार येत आहे. मालगुंड किनारी समुद्राच्या लाटांबरोबर हा महाकाय मासा किनाऱ्यावर आढळला. समुद्राची ओहोटी सुरू झाल्यानंतर तो किनाऱ्यावर आल्याचे नागरिकांनी पाहिले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ गणपतीपुळे पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित, पोलिस हवालदार भागवत यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ही माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कांदळवन वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडूकर, वनरक्षक प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वय पशुधन पर्यवेक्षक नीलेश वाघमारे आणि कासवमित्र आदर्श मयेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. या माशाला किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी पोलिस, वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे मदत केली. या देवमाशाचा मृत्यू होऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे तो पूर्णतः सडलेला होता. मालगुंड किनाऱ्यावरच जेसीबीने मोठा खड्डा खोदून हा मासा पुरून योग्य विल्हेवाट लावण्यात आली. रत्नागिरी समुद्रकिनारी मृत देवमासा लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वी मांडवी समुद्रकिनारी, मिऱ्या किनाऱ्यावर त्यानंतर मालगुंड येथे यापूर्वी देखील एक मृत देवमासा आढळला होता.