बँकेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेकडे बनावट दागिने तारण ठेवून ३७ लाख ३५ हजार ५८० रुपयांचे तारण कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केलेल्या १० जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२२ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत घडला. या प्रकरणी जितेंद्र नारायणदास शाह यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या नुसार प्रदीप रामचंद्र सागवेकर, गौरव विष्णू सागवेकर, नीलिमा नीलेश सागवेकर, सागर रमेश सागवेकर, नीलेश रमेश सागवेकर, सुधीर परशुराम रानीम, अक्षता सुधीर रानीम (सर्व राहणार सुकीवली सोनारवाडी) समीर रघुनाथ म्हसलकर (रा. खेड), राहुल अनंत संकपाळ (रा. सुकीवली – बौद्धवाडी), कमलाकर हरीश्चंद्र पालकर (रा. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील संशयितानी खेड येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून सोने तारण कर्ज मिळणेकरिता अर्ज केला.
सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून बनावट दागिने गहाण ठेवले. बँकेचे नियुक्त सोनार प्रदीप रामचंद्र सागवेकर यांनी संशयित २ ते १० यांनी सोने तारण करीता गहाण ठेवलेले दागिने बँकेचे सोने परीक्षक म्हणून तपासून सदर दागिने खरे असल्याचे भासवले. बँकेची तब्बल ३७ लाख ३५ हजार ५८० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.