मर्यादित उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या नगरपालिकेने शासन निर्देशाप्रमाणे पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पूर्वीच्या दरापेक्षा सुमारे ७० टक्के वाढीव पाणीपट्टी होणार आहे. ही पाणीपट्टी वाढ होत असताना पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींची पूर्तता व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागण्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंद स्थितीमध्ये असलेला फिल्टरेशन प्लान्ट कार्यरत होण्यासह (जल शुद्धीकरण) वर्षभरातील ३६५ दिवसापैकी किमान ३३० दिवस सुरळीत आणि वेळेत पाणीपुरवठा व्हावा आदींसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, उद्योजक प्रदीप भाटकर, आजिम चौगुले, संजय वरेकर, नागेश शेट्ये, विनायक शेट्ये, आनंद करंबेळकर, प्रसाद नवरे, मुश्ताक रखांगी, फरीद मुल्ला, नासीर सय्यद, दिलीप शिवदे, इम्तियाज काझी, विवेक गादीकर, बशीर सय्यद, प्रशांत मराठे, आजीम जैतापकर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी राजापूर तथा नगर पालिका प्रशासक यांनाही देण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष नार्वेकर यांनी दिली. वाढीव पाणीपट्टी करताना निवेदनाच्या माध्यमातून वेधण्यात आलेल्या मागण्यांची पूर्ती करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागण्या – वर्षभरात किमान ३३० दिवस किमान ९० लिटर नियमित पाणी द्या. पाणी निर्जंतुक असावे. वाढीव पाणीपट्टी करताना पाणी वेळेत मिळणे आवश्यक. पाणीपुरवठ्याची काही संयोजके आणि मेन लाईन ड्रेनेजच्या पाईपांजवळून गेलेली असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. जलवाहिनी दुरुस्तीवेळी उपयुक्त ठरणारा शहराचा जलनकाशा उपलब्ध व्हावा. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जलाशयाला कंपाऊंड वॉल असावे. फिल्टरेशन प्लान्ट असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे तो तत्काळ कार्यान्वित करावा.