येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून, दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी शासनाने चार कोटी ८६ लाख १६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजुरीचा अध्यादेश आज काढला. निधीच्या मंजुरीमुळे ‘वाशिष्ठी’तील गाळ काढण्याचे काम नियमितपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून नाम फाउंडेशनला इंधनपुरवठा केला जात होता. इंधनपुरवठ्यासाठी संस्थेस एक कोटी ३० लाख दिले जाणार होते. त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत एक कोटी २० लाखांचे इंधन पुरविले. केवळ १० लाख इतका निधी शिल्लक होता. परिणामी, पुढील निधी कधी उपलब्ध होईल, हे सांगता येत नसल्याने गाळ काढण्यासाठी तयार केलेले अडथळे काढून घ्यावेत, अशा सूचना पाटबंधारे खात्याने नाम फाउंडेशनला दिल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील शिल्लक कामासाठी पाच कोटी २१ लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ही फाईल तीन महिन्यांपासून मंत्रालयात होती. मात्र, आठवडाभरात काम थांबण्याची शक्यता असल्याने शासनाने चार कोटी ८६ लाखांचा निधी मंजुरीसह या कामास प्रशासकीय मान्यताही दिली आहे. सध्या नाम फाउंडेशनने यंत्रसामग्री लावून सध्या उक्ताड जुवाड बेट, गोवळकोट, बाजारपूल, गणेशघाट आदी ठिकाणी गाळ उपसा सुरू आहे. यंदा ‘नाम’ने आतापर्यंत दोन लाख १० घनमीटर गाळ काढला असून, दोन लाख ८० हजार घनमीटर गाळ उपसा केला आहे. सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने पावसाळा सुरू होईपर्यंत वाशिष्ठी गाळ उपसा सुरू राहण्यास मदत होईल.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या निधीपैकी केवळ १० लाख निधी शिल्लक होता. दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यास निधी मिळावा, यासाठी डिसेंबर २०२२ पासून चिपळूण बचाव समितीचे पदाधिकारी शासनाकडे पाठपुरावा करीत होते. पालकमंत्री . उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण स्थगित केले होते. मात्र, त्यानंतरही निधीची उपलब्धता झाली नव्हती. यासाठी समितीचे पदाधिकारी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करीत होते. ‘वाशिष्ठी’तील गाळ उपशासाठी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच पाच कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, मंजुरी अध्यादेशावर संबंधित मंत्र्यांची मान्यता मिळाली नव्हती. आता निधी मंजूर झाला असला, तरी यापूर्वीच तो मंजूर व्हायला हवा होता. जेणे करून गाळ काढण्याच्या कामाला आणखी वेग मिळाला असता; परंतु या निधीतून गाळ काढण्याचे काम पूर्ण होणार नाही. आणखी निधीची आवश्यकता आहे.