सध्या ग्रामपंचायत निवडणुकींचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी, प्रत्येक नेता, कार्यकर्ता जीव ओतून प्रयत्न करत आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वादंग उठले आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘‘वैभववाडी तालुक्यातील ३४ पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसहिंता सुरू आहे. आमदार राणे यांनी २२ नोव्हेंबरला भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत भाजपचा सरपंच आणि कार्यकारिणी बिनविरोध निवडुन द्या आणि ५० लाखांचा विकास निधी माझ्याकडून घ्या, असे वक्तव्य केल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयावर आल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून आचारसंहितेचा भंग झाला आहे.
महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्यानंतर भाजप अधिकच सक्रीय झाले आहे. भाजप पक्षाचा सरपंच आणि कार्यकारिणी बिनविरोध निवडून द्या आणि माझ्याकडून ५० लाखांचा विकास निधी घ्या, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी करुन निवडणूक आचारसहितेंचा भंग केल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यातून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी याबाबत कारवाई करून मोकळ्या वातावरणात निवडणूक प्रकिया पार पडेल याची दक्षता घ्या, अशी मागणीही लोके यांनी केली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करणे, आम. राणे यांना भारी पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.