कोकणात आंब्याचा हंगाम सुरु व्हायला अजून २-३ महिने बाकी असतानाच, देवगड हापूस आंब्याची दोन डझनची पेटी वाशी बाजारपेठेमध्ये विक्रीस दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातवण येथील दिनेश दीपक शिंदे आणि प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची दोन डझनची या हंगामातील पहिली पेटी आजच्या मुहूर्तावर फळ बाजारात पाठवली. ऐन नोव्हेंबरमध्येच हापूसने मुंबई बाजार गाठल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे.
वातावरणातील बदल आणि अनेक अडचणींचा सामना करत आणि प्रचंड मेहनत घेत तयार झालेला जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस’ आंबा आज वाशी फळबाजारात रवाना झाला. थंडीच्या सुरुवातीला झाडांना नवीन पल्लवी फुटायला सुरवात होते. त्यानंतर मोहोराची चाहूल लागते. मोहोर टिकवून फलधारणा होण्यासाठी बागायतदार योग्य ती फवारणी करतात. त्यानंतर आंबा पीक बाजारात जाते, असे सर्वसाधारण समीकरण असते.
मात्र अलीकडे शेतकऱ्याचे पिकांचे गणित निसर्गावर अधिक अवलंबून असते. काहीवेळा पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. यातून मोहोर टिकला तर हंगामाआधी आंबा पीक घेणे शक्य होते. हेच तंत्र तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेत वापरले आहे.
त्यांच्या बागेतील हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टच्या आसपास मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे काही कलमांवरील मोहोर गळून पडला; मात्र चार-पाच कलमांवरील मोहोर राहिला. प्रयोग म्हणून आलेला मोहोर टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. मोहोराची काळजी घेतल्याने त्यातून उत्तम फलधारणा झाली. त्यामुळेच चार कलमावरील उत्पादित झालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून ‘देवगड हापूस’ची पहिली पेटी आज विधिवत पूजा करून वाशीला पाठवण्यात आली.
हंगामाच्या आधीच फळबाजारात जाणाऱ्या दोन डझनच्या आंबा पेटीला सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज स्थानिक शेतकरी व्यक्त करीत होते. हापूस कलमांची योग्य निगा राखल्यास फलधारणा होऊ शकते, असे यातून निश्चित झाले आहे. वातावरणात होणाऱ्या वारंवार बदलामुळे, शिंदे बंधूंनी मोहोर टिकविण्यासाठी जीवाचे रान केले आणि नवीन तंत्र वापरून पहिले.