जिल्ह्यात अनेक ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवा मिळवण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून उपचार करून घ्यावे लागतात. कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून लोकांनी जीवाचे रान केले. दुर्दैवाने परत अशा प्रकारचे संकट येऊ नये म्हणून आरोग्य विभागाने सतर्क राहिले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्र आहेत; परंतु त्या एका केंद्रांमध्ये पंधरा-वीस गावे येतात. लोकांची सोय व्हावी म्हणून अंतराचा विचार करता आरोग्य उपकेंद्र व्हावेत म्हणून जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व्हे करून ५१ उपकेंद्र होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. पण ते शासन दरबारी धूळखात पडलेले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. या प्रस्तावांना शासनाने मंजुरी द्यावी,अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. ग्रामीण भागातील सर्प, विंचू, पिसाळलेली कुत्रे यांनी जर एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर त्याच्यावर इंजेक्शन, औषधोपचार तातडीने होणे आवश्यक आहे.
पण मुख्य आरोग्यकेंद्र काही गावांपासून लांब असल्याने तिथ पर्यंत वेळेमध्ये पोहचणे कठीण बनते. म्हणून जिल्ह्यातील आरोग्य विभागाने लोकांना सोईचे व्हावे म्हणून उपकेंद्राचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले आहेत. त्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ प्रस्ताव आहेत. ते तातडीने मंजूर करावे अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकांच्या जीवाशी खेळू नका. नागरिकांना आरोग्यसेवा देणे ही शासनाची जवाबदारी आहे, म्हणून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून तातडीने मान्यता द्यावी, अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील धूळ खात पडलेल्या आरोग्य उपकेंद्राचे ५१ प्रस्ताव मान्य करण्यात यावेत.