मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन देणारे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आता त्यादृष्टीने पावले उचलली असून आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या २ टप्प्यातील कामांना गती देण्यासंदर्भात त्यांनी जातीनिशी दिल्लीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बँकेचे अधिकारी, ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ३० मार्चला गडकरी – रत्नागिरीच्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामाची हवाई पाहणीदेखील केली 4 होती. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री ना. उदय सामंतदेखील उपस्थित होते. या पाहणीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी रखडलेल्या कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन देताना डिसेंबर २०२४ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल, असेदेखील सांगितले होते.
गडकरींनी आता त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या असून एक महत्वपूर्ण बैठक बुधवारी त्यांनी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात घेतली. आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या २ टप्प्यांचे काम करणारी रोडवेज सोल्युशन या ठेकेदार कंपनीसह सब ठेकेदार कंपनी म्हात्रे आणि कंपनी तसेच हॅन्स कंपनीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. यावेळी आर्थिक अडचणींसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला.काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला वेळेवर निधी उपलब्ध होईल याबाबत काही निर्णय घेण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसातच ठरलेल्या कामांची अंमलबजावणी सुरू होईल असे ते म्हणाले: कामाला वेग देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे दिसते आहे.