मुरूड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये ईडीने सोमवारी याआधी अटक केलेले रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि दापोलीचे माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्याविरूद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हा कथित मनीलॉण्ड्रींगचा (अवैध सावकारी) असल्याचे तपासात पुढे आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. दरम्यान या साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि रत्नागिरीचे माजी पालकमंत्री यांचे नाव किरीट सोमय्या वारंवार घेत असताना ईडीच्या आरोपपत्रात त्यांचे नाव नाही. आपला या रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, किरीट सोमय्या केवळ बदनामीच्या हेतूने आपले नाव याप्रकरणाशी जोडत आहेत, असा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब वारंवार करत होते. या दाव्याला पुष्टी मिळताना दिसते आहे. दापोली तालुक्यातील मुरूडच्या समुद्रकिनारी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट उभारण्यात आल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप वारंवार केला. संबंधित ठिकाणी तक्रारी दिल्या: त्यानंतर अनेकांवर गुन्हेदेखील दाखल झाले. या रिसॉर्टप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने चौकशी देखील केली.चौकशीअंती खेड येथील उद्योजक सदानंद कदम, दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक देखील झाली. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने झालेल्या तपासात मनी लॉण्ड्रींगचे प्रकरण पुढे आले.
मधल्या काळात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेली चौकशी आणि दिलेल्या आदेशानुसार हे रिसॉर्ट बेकायदेशीर ठरविण्यात आले आणि ते पाडण्याचे आदेश देखील जारी झाले. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याची पूर्वतयारी सुरू केली. त्यासाठी निविदा मागविण्यात आली. मात्र त्यानंतर कोर्टात प्रकरण गेले आणि रिसॉर्ट पाडण्यास स्थगिती आली आहे. आता या वादग्रस्त रिसॉर्टप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात उद्योजक सदानंद कदम आणि माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्याविरूद्ध दोषारोप दाखल करण्यात आले आहेत. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्ड्रींग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत एकूण उत्पन्न १०.२ कोटी रूपये होते असे आरोपपत्रात म्हटले आहे.