विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी, हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या २५ मे रोजी करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनाची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत सभागृहात झाली. सामंत यांनी विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या तालुकानिहाय महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेतली. या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेटच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन ,परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, नगरपालिका, परिवहन महामंडळ या विभागांना दिल्या.
सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिस विभागाला दिल्या. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या वेळी जलयुक्त शिवार टप्पा २ गाळमुक्त धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते.