मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील एका बोगद्यामधून दुतर्फा वाहतूक सोमवारपासून (ता. १) सुरू करण्यात आली. हलक्या वाहनानांच परवानगी दिलेली असताना रात्रीच्यावेळी अवजड वाहने दुसऱ्या बाजूने बोगद्यातून ये-जा करतात. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. यामध्ये दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याबाबत संबंधित खात्याकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनाच करण्यात आलेल्या नसल्यामुळे वाहनचालाकंकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोमवारी (ता.१) एका बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
कोकणमार्गे मुंबईत जाण्यासाठी लहान वाहनांना आता कशेडी घाटातील बिकट वाट पार करावी लागणार नाही. महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने आता लहान वाहनांना सध्या वाहतूक सुरू असलेल्या बोगद्यातून प्रवेशाची परवानगी दिली आहे. आता कशेडीतील एका बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा जाणाऱ्या लहान वाहनांना कशेडी बोगद्यातून प्रवेश देण्यात येत होता; परंतु गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती.
सातत्याने प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन हलक्या वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे; परंतु छोट्या वाहनांना बोगदा अथवा जोडरस्त्यावर थांबता येणार नाही. ताशी ४० किमी वेग मर्यादा पाळावी लागेल. एसटी बस, मालवाहू ट्रक, टँकर, डंपर यासह अवजड वाहनांना कोणत्याही परिस्थितीत बोगद्याचा वापर करता येणार नाही. अवजड वाहने कशेडी घाटमार्गेच मुंबई-गोवा व गोवा-मुंबई मार्गक्रमण करतील, असे गोसावी यांनी सांगितले.
सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आवश्यक – दोन्ही बाजूला मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहेत. रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक, वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच, बोगद्याच्या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलिसांचे पेट्रोलिंग, आवश्यक ठिकाणी वेगमर्यादेसाठी रम्बलर अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे.