माकडांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी वनविभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली होती. १६ ते २१ या कालावधीत ७१ माकडे पकडण्यात यश आले आहे. त्यासाठी संभाजीनगर येथून दोन प्रशिक्षितांची मदत घेतली जात आहे. एका माकडाला पकडण्यासाठी ८०० रुपये दिले जातात. दिवाळीनंतर ही मोहीम वेगाने सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे तसेच हिवाळी शेतीमध्ये भाजीपाला, भातशेती केली जाते. गेली काही वर्षे फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. दरवर्षी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे; परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे आणि बागायतदारांनी माकड, वानरांपासून होणाऱ्या उपद्रवाबद्दल आवाज उठवला होता. त्यासाठी आंदोलनही केली.
माकड पकडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामधून माकड पकडण्यासाठी दोन पिंजरेही विकत घेण्यात आले आहेत. मे महिन्यात गोळप येथे माकड पकडण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनाधिकारी प्रियंका लगड, रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या सूचनेनुसार १६ ऑक्टोबरपासून माकडे पकडण्यास सुरुवात झाली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली, खेड तालुक्यांत काही वानर पकडण्यात आले. ही मोहीम राबवण्यासाठी संभाजीनगर येथून प्रशिक्षित लोकांना बोलावण्यात आले आहे. पकडलेले वानर अभयारण्यात सोडण्यात येतात. रत्नागिरीतील माकडे सह्याद्रीच्या जंगल भागात सोडली जातात.
एक माकड पकडण्यासाठी आठशे रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दिवाळी सुटीमुळे ही मोहीम थांबली असून, त्यानंतर वेगाने माकडे पकडण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने आंबा हंगाम सुरू होतो. त्यापूर्वी माकडे पकडली तर त्याचा फायदा निश्चितच बागायतदारांना होईल. दरम्यान, जिल्ह्यात माकडांची संख्या अधिक असून, पिंजरे दोनच आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात माकडे पकडण्याच्या मोहिमेचा किती फायदा होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.