कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकणातील हापूस आंबा व काजू जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात पाठवले जातात. सध्या सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूगराला बाजारात अधिक मागणी असून हिरवी काजू बी व ओले काजूगर विक्रीसाठी देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत दाखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर बाजारपेठेत कैऱ्या व काजूगर विक्रीसाठी दाखल झाल्या असून ग्राहकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत आहे. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे शेतकरी व बागायतदार वर्ग त्रस्त झाला आहे. सुरुवातीला आलेला मोहर अवकाळी पावसामुळे काळवंडला असला तरी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेत बागायतीचे रक्षण केले. सध्या बागांमध्ये तयार झालेल्या कैऱ्या व काजूगर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.
मात्र उत्पादन घटल्याने कैरी व काजूगराचे दर चढे आहेत. बाजारपेठेत काजू प्रतिकिलो सुमारे २५० रुपये तर ओला काजूगर प्रतिकिलो सुमारे १२०० रुपयांनी विक्री होत आहे. देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या काजू व कैरीमुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले असून बचत गटातील महिलांनी काजूगर प्रक्रिया, पॅकिंग व थेट विक्रीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना आर्थिक लाभहोऊ शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सध्या बागांमध्ये तयार झालेल्या कैऱ्या व काजूगर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळ्या कामानिमित्त कोकणात येणारे चाकरमानी आणि पर्यटक या कोकणी मेव्याकडे आकर्षिले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा मेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

