रत्नागिरी: जिल्ह्यातील पावस परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारूविक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पावस बाजारपेठ ते गोळप दरम्यान जाणाऱ्या पायवाटेवर घराच्या भिंतीच्या आडोशाला लपवून सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या साठ्यावर छापा टाकून पोलिसांनी एका महिलेकडून सुमारे ९४० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. परिसरात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पायवाटेवरील एका घराच्या भिंतीच्या आडोशाला तपासणी केली असता, तेथे विक्रीसाठी ठेवलेला हा साठा आढळून आला.
या घटनेप्रकरणी महिला पोलीस हवालदार सरोज वंडकर यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेकायदेशीर विक्रीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे अंमलदार करत आहेत.
ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या हातभट्टी दारूविक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी अशा कारवायांवर करडी नजर ठेवली असून, पुढील तपास सुरू आहे.

