रत्नागिरी: महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधी पानमसाल्याची विक्री व साठवणुकीवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने याची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गोपनीय पद्धतीने एक धडक कारवाई केली. येथील ‘भराडीन जनरल स्टोअर्स’ या दुकानावर छापा टाकत अधिकाऱ्यांनी विमल पानमसाला आणि प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे.
अशी झाली कारवाई… कुवारबाव येथील एका जनरल स्टोअर्समध्ये बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी कोणतीही सुगावा लागू न देता ‘भराडीन जनरल स्टोअर्स’वर अचानक धाड टाकली. दुकानाचा कोनाकोपरा तपासला असता, तिथे लपवून ठेवलेला विमल पानमसाला आणि प्रतिबंधित गुटख्याचा साठा पथकाच्या हाती लागला.
या धडक कारवाईत प्रशासनाने ७१ पॅकेट्स आणि ९५ गुटख्याचे पौच (पुड्या) जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेला हा सर्व माल अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याने तो त्वरित ताब्यात घेण्यात आला असून, दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भ्रामक जाहिराती आणि फसव्या ब्रँड्सवर प्रशासनाचा ‘वॉच’ केवळ गुटखा विक्रीच नव्हे, तर बाजारामध्ये सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिराती आणि फसव्या ब्रँड्सच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीवरही प्रशासनाने आता आपला मोर्चा वळवला आहे. “तंबाखूजन्य आणि आरोग्याला हानिकारक असणाऱ्या पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांनी दिला आहे. या कारवाईमुळे रत्नागिरीतील बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

