मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे सनई-चौघडे वाजत आहेत! ‘कारभारी लयभारी’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ऑनस्क्रीन जोडी, म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुषा सरकटे, आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे ‘कारभारी’ झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती, आणि अखेर हा शुभविवाह अत्यंत थाटामाटात पार पडला आहे.
या गोड जोडप्याचा विवाहसोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. निखिल आणि अनुष्काच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मंडपातील ती ‘लयभारी’ एन्ट्री! दोघांच्या लग्नात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या अनोख्या आणि पारंपरिक एन्ट्रीने! डोक्यावर तुळस आणि हातात सन्मानाने धरलेला भगवा झेंडा अशा अत्यंत मराठमोळ्या आणि दिमाखदार पद्धतीने या नवदांपत्याने लग्नबंधनात पाऊल ठेवले. त्यांच्या या पारंपरिक लुकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
लग्नासाठी अनुष्काने सुंदर नऊवारी साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. तर निखिलने पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करून अगदी परफेक्ट मराठमोळा लुक कॅरी केला होता. लग्नाआधी पार पडलेले हळद आणि संगीत सोहळेही भलतेच गाजले; ज्याचे व्हिडिओ चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.
ऑनस्क्रीन जोडी आता रिअल लाईफमध्ये एकत्र! ‘कारभारी लयभारी’ मालिकेत या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. निखिल चव्हाणने यापूर्वी ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून ‘विक्रम’च्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली होती, तर अनुष्का सरकटे सध्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी तिने ‘कारभारी लयभारी’ सोबतच ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या आवडत्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधताना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे!

