संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. मोठ्या दिमाखात आणि घाईघाईत सुरू करण्यात आलेल्या संगमेश्वर येथील नवीन ‘सोनवी पुलावर’ मंगळवारी सकाळी पहिलाच मोठा आणि भीषण अपघात झाला. दोन अवजड ट्रक या पुलावर एकमेकांना समोरासमोर अत्यंत वेगाने धडकले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुलाच्या धोकादायक रचनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुलाच्या दिशेने झाला भयानक आवाज!
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. इतक्यात अचानक सोनवी पुलाच्या दिशेने एक प्रचंड आणि भयानक आवाज झाला. हा आवाज एवढा मोठा होता की जवळच असलेल्या बसस्थानकातील प्रवासी, एसटीचे चालक-वाहक आणि परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तिथे पाहतात तर काय, दोन मोठे ट्रक एकमेकांवर अत्यंत वाईट पद्धतीने आदळले होते. दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले.
या घटनेत झेवियर अल्वेरीस (वय ३१), शहीद पानाडी (वय २३) आणि सुरेश बांगर (वय ३२) हे तिघे जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना तातडीने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले आहे.
तीव्र वळण आणि एकच मार्गिका: अपघाताचे मुख्य कारण
हा पूल सुरू होऊन अजून महिनाभरही पूर्ण झाला नव्हता, तोच हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. वास्तविक, मुंबईच्या बाजूच्या पुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या याच एका मार्गिकेवरून (Single Lane) मुंबई आणि गोवा अशा दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहने सोडली जात आहेत.
त्यातच, हा पूल अत्यंत तीव्र वळणाचा आहे. यामुळे समोरून नेमके कोणते वाहन येत आहे, याचा अंदाज चालकांना वेळेत येत नाही. वेगवान आणि अवजड वाहने या अरुंद वळणावर अचानक समोरासमोर आल्यामुळेच हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पुलावर सुरक्षेच्या कोणत्याही पुरेशा उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात झाल्याचा थेट आरोप आता नागरिक करत आहेत.
महामार्गावर लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
अपघात इतका विचित्र होता की दोन्ही ट्रक पुलाच्या अगदी मध्यभागी अडकून पडले होते. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची प्रचंड कोंडी झाली आणि प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागले.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मोठ्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला सारले. त्यानंतर कुठे महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरळीत झाली.

