रत्नागिरी: हातात दप्तर, डोळ्यात शिक्षणाची ओढ, पण पायाखाली गुडघाभर चिखल, जीवघेणे खड्डे आणि दोन्ही बाजूंना पसरलेली काटेरी झुडपं… हे चित्र कुठल्या दुर्गम जंगलातील नाही, तर रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ते वरवडे या मार्गावर रोज घडणारे वास्तव आहे. मागील तब्बल सहा वर्षांपासून या मार्गावरील एसटी बससेवा बंद असल्याने पहिली ते दहावीत शिकणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना दररोज अनेक किलोमीटरची खडतर पायपीट करावी लागत आहे.
आपल्या व्यथा जगासमोर मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुकताच एक व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला. या व्हिडिओने सर्वांचेच डोळे पाणावले असून, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी ही धडपड आता चर्चेचा विषय ठरली आहे.
रस्त्यावर चिखल, वेगाने धावणारी वाहने आणि अपघाताची भीती
कळझोंडी आणि वरवडे परिसरातील लहान मुले दररोज याच मार्गाने शाळेत ये-जा करतात. रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, पायी चालणेही अशक्य झाले आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि चिखल वाहनांच्या चाकांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर आणि गणवेशावर उडतो. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना चुकवून बाजूला उभे राहणेही कठीण होते.
सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघातानंतर एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा अचानक बंद केली होती. तेव्हापासून आजतागायत ही बससेवा पूर्ववत न झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून शाळेची वाट धरावी लागत आहे.
आज्ञा विचारे हिच्या धाडसाचे कौतुक; विद्यार्थ्यांचा होणार गौरव
आपल्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थिनी आज्ञा विचारे आणि तिच्या सहकाऱ्यांनी हिंमत दाखवून रस्त्याची खरी परिस्थिती व्हिडिओद्वारे मांडली. या व्हिडिओची ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी तत्काळ दखल घेतली.
विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक करताना प्रसाद सावंत म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जिथे मुले प्रगतीच्या नव्या शिखरांना गवसणी घालत आहेत, तिथे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अशा नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. पालकमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याच मतदारसंघात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते, हे मोठे दुर्दैव आहे.” तसेच प्रशासनाला जागे करणाऱ्या आज्ञा विचारे व तिच्या सहकाऱ्यांचा लवकरच गौरव केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी
प्रसाद सावंत यांनी या प्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कळझोंडी-वरवडे मार्गावर तातडीने नियमित बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. सोबतच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
“शिक्षणाचा हक्क केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात मिळायला हवा,” अशी भावना व्यक्त करत या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शासन आणि प्रशासन कधी जागे होणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांकडून विचारला जात आहे.

