HomeRatnagiriतुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका; रत्नागिरीतील अनेक मिठाई आणि केकची दुकाने बंद!

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका; रत्नागिरीतील अनेक मिठाई आणि केकची दुकाने बंद!

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्यामुळे भेसळखोर विक्रेत्यांचे धाबे दणाणले; तपासणी टाळण्यासाठी दुकानांना कुलूप.

रत्नागिरी: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरात सुरू असलेल्या धडक आणि कडक कारवायांचा धसका आता कोकणातही पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खाद्यपदार्थ बाजारात सध्या मुंढे यांच्या नावाची जबरदस्त दहशत निर्माण झाली असून, संभाव्य कारवाईच्या भीतीने अनेक मिठाई आणि केक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांचे शटर डाऊन केले आहे; तर काहींनी मिठाईचे उत्पादनच तात्पुरते थांबवले आहे.

स्वस्त दरांच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

गेल्या काही वर्षांत परराज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी रत्नागिरी शहर आणि उपनगरांमध्ये मिठाई तसेच केकची भव्य दुकाने थाटली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही दुकाने अत्यंत कमी आणि अविश्वसनीय दरात पदार्थ विकत होती. मात्र, कमी किमतीच्या मागे पदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आली होती.

अस्वच्छता आणि भेसळयुक्त कच्चा माल

मिठाई आणि केक तयार करताना अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अत्यंत अस्वच्छ वातावरणात, निकृष्ट दर्जाचे तेल, मावा आणि घातक घटकांचा वापर करून हे खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचे बोलले जात आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ आता अन्न व औषध प्रशासनाच्या थेट रडारवर आला आहे.

तपासणीपूर्वीच पळ काढण्याचा सपाटा

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न भेसळखोरांवर राज्यभर मोहिमा उघडून कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात तुकाराम मुंढे यांचा रत्नागिरी दौरा नियोजित असल्याची चर्चा सुरू होताच स्थानिक व परप्रांतीय नियमबाह्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईत भेसळ उघडकीस येऊन मोठा दंड किंवा गुन्हा दाखल होण्यापेक्षा दुकाने बंद ठेवणेच या व्यावसायिकांनी पसंत केले आहे. यामुळे सध्या रत्नागिरीतील बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular