छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर परिसरातील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर संपूर्ण परिसराला सुन्न करून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. टोकाचे पाऊल उचलण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या तरुण मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई-वडिलांचाही दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई-सातारा परिसरात राहणारा १८ वर्षीय तरुण कुणाल मुरलीधर चांदवडे हा काही कारणास्तव मानसिक तणावातून शुक्रवारी तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर गेला होता. मुलगा टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागताच, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांनी काही स्थानिक नागरिकांसह तातडीने डोंगराच्या दिशेने धाव घेतली.
वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न आणि काळाचा घाला
डोंगराच्या कड्यावर पोहोचल्यानंतर वडिलांनी मुलाला समजवून मागे खेचण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्या झटापटीत आणि डोंगराच्या निसरड्या कड्यावर तोल गेल्याने मुलगा आणि वडील दोघेही खोल दरीत कोसळले. उंचावरून खाली पडल्याने दोघांचाही जागीच अंत झाला.
डोळ्यांसमोर संसार संपल्याचा धक्का
आपल्या डोळ्यांदेखत पती आणि तरुण मुलाला खोल दरीत कोसळताना पाहून आई संगीता चांदवडे यांना तीव्र मानसिक धक्का बसला. डोळ्यांसमोर संपूर्ण संसार क्षणात उद्ध्वस्त झाल्याचे पाहून असह्य झालेल्या मातेनेही त्याच दरीत उडी घेतली. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. एका क्षुल्लक किंवा अनाकलनीय तणावातून संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण संभाजीनगर शहरावर शोककळा पसरली आहे.

