रत्नागिरी: दारूचे व्यसन आणि त्यातून उद्भवणारे कौटुंबिक वाद किती भयंकर वळण घेऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना रत्नागिरी शहरालगत असलेल्या भाटये महाजनवाडी येथे समोर आली आहे. क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट हिंसेत होऊन एका पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात प्राणघातक हल्ला आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. आरोपी कैलास सुधीर भाटकर हा दारूच्या नशेत मांसाहारी चायनीज पदार्थांचे पार्सल घेऊन भाटये महाजनवाडी येथील घरी पोहोचला.
त्यावेळी त्याची पत्नी गौरी कैलास भाटकर (वय ४१) यांनी त्याला जाब विचारला की, “तू घरी का आलास? तुला आज अचानक बायको आणि मुलाची आठवण कशी झाली? तू त्या रुचीसोबतच राहा.” या शब्दांवरून आरोपीचा पारा चढला आणि त्याने कसलाही विचार न करता पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मुलाने वाद मिटवण्याचा केला प्रयत्न, पण…
घरातील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून त्यांचा अल्पवयीन मुलगा आराध्य आईच्या मदतीला धावून आला. त्याने आपल्या वडिलांना हात जोडून विनंती केली, “बाबा, माझ्या आईला शिव्या देऊ नका.” मात्र, मुलाची ही मध्यस्थी नशेत धुंद असलेल्या वडिलांना अजिबात सहन झाली नाही. त्याने उलट संतापून स्वतःच्या मुलाचा हात पकडला आणि त्याला घरातून बाहेर रस्त्यावर फरफटत ओढत नेले.
मुलाला सोडवायला गेली अन्…
आपल्या पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे ओढले जात असल्याचे पाहून आईचे हृदय हेलावले. गौरी भाटकर यांनी तातडीने धाव घेत मुलाला पतीच्या तावडीतून सोडवले आणि सुरक्षित बाजूला केले. त्या पतीला म्हणाल्या, “मुलाला हात लावायचा नाही, भांडण आपल्या दोघांमध्ये आहे.”
या गोष्टीचा प्रचंड राग अनावर झाल्याने आरोपी कैलास भाटकर याने रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड उचलला आणि कसलाही विचार न करता थेट पत्नीच्या डोक्यात घातला. या जोरदार हल्ल्यात गौरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी गौरी भाटकर यांनी २४ ऑगस्ट रोजी पहाटे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपी कैलास सुधीर भाटकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११७(१), ३५२ तसेच भा.दं.वि. (IPC) कलम ३२४ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

