रत्नागिरी: गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी वारंवार जागा बदलणाऱ्या आणि तब्बल चार वर्षे गुंगारा देणाऱ्या एका सराईत चोराच्या अखेर रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन मोठ्या घरफोड्यांमधील मुख्य संशयित आरोपीला पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.
धरम केशव निषाद (वय २२ वर्षे, मूळ रा. किसनपूर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. बोईसर, जि. पालघर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय होती?
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२२ मध्ये चोरी आणि घरफोडीच्या दोन गंभीर घटना घडल्या होत्या. चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४५४, ४५७ आणि ३८० अन्वये गुन्हा नोंदवला होता (गु.र.क्र. १९७/२०२२ आणि १९९/२०२२).
तपासादरम्यान या दोन्ही गुन्ह्यांमध्ये धरम निषाद याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो रत्नागिरीतून पसार झाला. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा आरोपी वारंवार आपले पत्ते बदलून पोलिसांना चकवा देत होता.
तांत्रिक तपास अन् बोईसरमध्ये सापळा
गेल्या चार वर्षांपासून फरार असला तरी पोलीस त्याचा मागोवा घेत होते. अखेर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाला धरम निषाद पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात नाव व ओळख लपवून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे नेमके लोकेशन शोधून काढले. त्यानंतर एका विशेष पथकाने तातडीने बोईसर गाठून सापळा रचला आणि संशयिताला कोणत्याही प्रतिकाराची संधी न देता बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीनंतर त्याला दोन्ही गुन्ह्यांत अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर साळवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बंडबे आणि बाळू गीते यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. फरार आरोपीला गजाआड केल्याबद्दल या तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

