HomeKhedराज्यमंत्री योगेश कदम यांचा तोतया पी.ए. जेरबंद; खेड पोलिसांची कारवाई

राज्यमंत्री योगेश कदम यांचा तोतया पी.ए. जेरबंद; खेड पोलिसांची कारवाई

चिरा खाण प्रकरणातील तक्रारीच्या बहाण्याने सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजारांची फसवणूक करणाऱ्या तोतया पी.ए.ला अटक.

खेड (रत्नागिरी): शासकीय पदाचा आणि नावाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले असून, असाच एक खळबळजनक प्रकार खेड तालुक्यात उघडकीस आला आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचा स्वीय सहाय्यक (P.A.) असल्याचा बनाव रचून एका सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया पी.ए. ला खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविराज चिखले असे या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६) हे मागील काही काळापासून चिपळूण परिसरातील चिरा दगडांच्या अनधिकृत खाणींविरोधात कायदेशीर लढा देत आहेत. या अनधिकृत खाण व्यावसायिकांमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. हा सर्व गंभीर प्रकार महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याविरोधात कारवाई व्हावी, यासाठी साळुंखे प्रयत्नशील होते.

याच दरम्यान, संशयित आरोपी रविराज चिखले याने सामाजिक कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. आपण महसूल राज्यमंत्र्यांचे जवळचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचे भासवून त्याने साळुंखे यांचा विश्वास संपादन केला. मंत्र्यांपर्यंत तक्रार पोहोचवून आणि चिरा खाण प्रकरणावर कठोर कारवाई करून घेण्यासाठी मदत करण्याच्या बहा-याने त्याने ५ हजार रुपयांची रक्कम उकळली.

पोलिसांची धडक कारवाई आणि कोठडी

काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत सविस्तर तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवली आणि संशयित आरोपी रविराज चिखले याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये किंवा फसवणुकीच्या या प्रकारामागे आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येलवे करत आहेत. या घटनेमुळे खेड आणि चिपळूण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular