HomeRatnagiriरत्नागिरीत ६० हजारांची लाच घेताना प्रादेशिक बंदर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरीत ६० हजारांची लाच घेताना प्रादेशिक बंदर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

परदेशी जहाजाच्या पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी मागितली होती लाच; खाजगी मध्यस्थासह दोघे ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा वर्ग-१ चा प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ जेरबंद केले आहे. त्याच्यासोबत एका खाजगी मध्यस्थालाही ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे शासकीय आणि बंदर व्यवस्थापन वर्तुळात मोठी चलबिचल सुरू झाली आहे.

नेमकी घटना काय? (सविस्तर वृत्त)

तक्रारदाराची एक शिपिंग एजन्सी असून, याद्वारे ते रत्नागिरी परिसरात परदेशातून येणाऱ्या जहाजांना विविध सेवा आणि दुरुस्तीचे काम पुरवतात. अलीकडेच जयगड पोर्ट येथे एक परदेशी नादुरुस्त जहाज दुरुस्तीसाठी आले होते. सदर जहाजाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर समुद्रात त्याची चाचणी घेण्याची परवानगी मिळणे आवश्यक होते, तसेच त्यासाठी ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ (Port Clearance Certificate) काढायचे होते.

या कायदेशीर आणि शासकीय प्रक्रियेसाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला तब्बल ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तडजोड होऊन अखेर ८० हजारांवर व्यवहार ठरला. त्यानंतर जहाजाला समुद्र चाचणीऐवजी फायर फायटिंग ट्रायलची परवानगी देण्यात आली आणि प्रमाणपत्राच्या मोबदल्यात लाचेची रक्कम मागितली जाऊ लागली.

एसीबीचा यशस्वी सापळा आणि कारवाई

या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी थेट रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची तात्काळ दखल घेत एसीबीच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष मोबाईल फोनवरून पडताळणी केली. यादरम्यान मुख्य अधिकारी संदीप भुजबळ यांनी ठरलेली रक्कम (८० हजारांपैकी पहिला हप्ता ६० हजार रुपये) आपला खाजगी मध्यस्थ मिलिंद तुकाराम बनप (वय ५३) याच्याकडे देण्यास सांगितले.

नियोजित बेनिनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिर परिसरातील ‘हॉटेल कार्निवल’ रेस्टॉरंट बारमध्ये तक्रारदार पैसे देण्यासाठी पोहोचले. पंचांसमक्ष खाजगी मध्यस्थ मिलिंद बनप याने अधिकारी संदीप भुजबळ यांच्यावतीने रोख ६० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि तत्काळ फोनवरून पैशांची देवाणघेवाण झाल्याची माहिती भुजबळ यांना दिली. याच क्षणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने धाड टाकून मिलिंद बनप याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर आज (१७ नोव्हेंबर) मुख्य आरोपी अधिकारी संदीप भुजबळ यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular