रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि त्यांच्या सोबतीने येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्थानक परिसरात याआधी सुरू असलेल्या मनमानी पार्किंग वसुली आणि ठेकेदारांच्या अरेरावीविरोधात युवासेनेने आक्रमक भूमिका घेत जनआंदोलन छेडले होते. अखेर या संघर्षाला मोठे यश आले असून, कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात ‘ड्रॉप अँड गो’ (Drop and Go) सुविधा पूर्णपणे मोफत जाहीर केली आहे.
काय आहे प्रकरण?
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या नागरिकांकडून भरमसाठ पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रार सातत्याने समोर येत होत्या. या मनमानी कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या मुद्द्याची गंभीर दखल घेत ठाकरे युवासेनेने कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
यावर तातडीने कारवाई करत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे. माजी युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत यांना दिलेल्या या पत्रानुसार, आता रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.
ठेकेदारांच्या मनमानीवर कडक चाप
या नव्या आदेशानंतर पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने संबंधित पार्किंग ठेकेदाराला कडक सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून जर कुणी निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास किंवा अरेरावी केल्यास त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे स्थानक परिसरात अधिकृत दर फलक लावणे देखील ठेकेदाराला सक्तीचे करण्यात आले आहे.
प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या सकारात्मक निर्णयानंतर युवासेनेचे आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

