रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री देव गणपतीपुळे मंदिराच्या परिसरातून देवस्थानच्या मालकीच्या दोन पितळी घंटा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. भाविकांची मोठी वर्दळ आणि धार्मिक महत्त्व असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरूनच या घंटा लंपास झाल्याने स्थानिक परिसर आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. चोरीला गेलेल्या दोन्ही घंटांची एकूण किंमत १६ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील तळ्याजवळ एक फायबर शेड असून त्याच्या लोखंडी बारला साखळीच्या साहाय्याने एक पितळी घंटा बांधून ठेवण्यात आली होती. सुमारे ३ किलो वजनाची आणि १२ हजार रुपये किमतीची ही घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याशिवाय, प्रदक्षिणा मार्गाच्या उतारावरील पूर्वेकडील देवळी येथे लोखंडी रॉडला अडकवलेली दुसरी पितळी घंटाही चोरट्याने लंपास केली आहे. या दुसऱ्या घंटेचे वजन १ किलो असून तिची किंमत ४ हजार रुपये इतकी आहे. अशा प्रकारे प्रदक्षिणा मार्गावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून या दोन्ही घंटा गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही घंटा चोरीला गेल्याचे लक्षात येताच गणपतीपुळे येथील नीलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (वय ४९) यांनी तातडीने जयगड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून जयगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, या चोरीचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

