राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशोकभाई कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोकणातील शेती, बागायती आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे प्रश्न प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडणे आणि त्यांना न्याय्य हक्क मिळवून देणे, हे या निवडीमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशोक कदम यांच्या रूपाने किसान सभेला अनुभवी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व लाभल्यामुळे, येत्या काळात जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, अशी भावना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि संघटनात्मक विस्ताराचा विश्वास
या निवड प्रक्रियेदरम्यान आणि अभिनंदन सोहळ्याच्या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून अशोक कदम यांचे स्वागत केले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष राकेशशेठ जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सहाय्यक सरव्यवस्थापक संतोष जाधव, अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी सदस्य खालिद पटाईत तसेच सिव्हिल इंजिनिअर पंकज जाधव यांचा समावेश होता.
अशोकभाई कदम यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय व राजकीय अनुभवाचा, संघटनात्मक कौशल्याचा आणि सामाजिक कार्याचा किसान सभेच्या विस्तारासाठी निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

